‘मुंडेंच्या राजीनाम्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; सुप्रिया सुळे यांची मागणी

बारामती: बीडमधील सरपंच हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी मुंडेंच्या राजीनाम्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, अशी मागणी केली. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
मुंडे यांच्या राजीनाम्याची विविध पक्षांकडून मागणी होत असल्याच्या प्रश्नावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महायुतीचे आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके यांनीच राजीनाम्याची मागणी केली आहे. तरीही मुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेत नसतील, तर त्याचे उत्तर त्यांनाच विचारावे लागेल.
हेही वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना केल्या सूचना, म्हणाले…!
पालकमंत्री नेमण्याचा तिढा अद्याप सुटला नसल्याच्या प्रश्नावर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अनेक वर्षे सत्ता जवळून पाहिली आहे. परंतु, पालकमंत्रिपदावरून एवढी रस्सीखेच झालेली मी आजवर कधीही बघितली नव्हती. पालकमंत्रिपदात काय गूढ आहे, हे मला समजत नाही.
दिल्लीत होत असलेल्या निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अनेक मतदारांची नावे यादीत आली आहेत. ती कुठून आली, हे केजरीवाल यांनाही माहीत नाही. स्वतः केजरीवाल यांनी त्यासंबंधीची यादीच सादर केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता काय भूमिका घेते, हे बघावे लागेल. पण, निवडणूक पारदर्शक व्हावी एवढीच आमची मागणी असल्याचे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.




