इंदापूरमधील राजकीय कार्यकर्त्याकडे विमानतळावर सापडली २८ काडतूसे

पुणे : लोहगाव विमानतळावरून हैदराबादला निघालेल्या प्रवाशाच्या पिशवीतून २८ काडतुसे जप्त करण्यात आली होती. संबंधित प्रवाशी भाजपचा युवा मोर्चाचा सचिव असल्याचे उघडकीस आले आहे. विमानतळावरील सुरक्षा विभागाने बॅगेत काडतुसे बाळगल्याप्रकरणी त्याला पकडून पोेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
दीपक सीताराम काटे (वय ३२, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत इंडिगो एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती भोसले ३ जानेवारी रोजी पावणेअकराच्या सुमारास प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करत होत्या. काटे हे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून हैदराबादला जाणार होते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी धातूशोधक यंत्राकडून (मेटल डिटेक्टर) केल्या जाणाऱ्या तपासणीत काटे यांच्या पिशवीत दोन मॅगझीन, तसेच २८ काडतुसे सापडली. याबाबत काटे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी काडतुसे का बाळगली? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा
दरम्यान राज्यात बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत वातावरण गरम असतानाच दुसरीकडे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे दोन मॅकझिंनसह २८ काडतुसे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे या व्यक्तीचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दिपक काटे हा मुळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवाशी असून तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाऊंडेशन संघटनेचा संस्थापकही आहे.
सोशल मिडीयावर त्यांचे अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो दिसून येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते, मुरलीधर मोहोळ या नेत्यांसोबत त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. एअर पोर्टच्या आतमध्ये प्रवेश करताना मेटल डीटेक्टरच्या सहाय्याने त्याच्याकडील बॅगचे चेकींग झाले, असता त्यामधे पीस्तुल आणि काडतुसे असल्याचे सुरक्षा रक्षकांना लक्षात आले. त्यानंतर त्याच्याकडील काटेरी बॅग उघडून पाहिली असता दोन मॅगझीन आणि 28 जिवंत काडतुसे आढळून आली आहेत.




