संगमनेर येथील दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे छापे
कारवाईत एकुण तीन लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर : संगमनेर येथील दोन कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकले. या कारवाईत १६ जनावरांची सुटका करून तीन लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच कबरअली गुलाम सौदागर (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) व फारूख युसूफ सय्यद (वय ३२, रा. अलकानगर, जोर्वे, संगमनेर) या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरमध्ये जोर्वे रोडवर दोन ठिकाणी कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवलेली आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पंचासमक्ष दोन ठिकाणी छापे टाकले. त्यात ६ गायी, २ बैल, ४ गोऱ्हे, ४ कालवड अशा १६ जनावारंची सुटका करण्यात आली. कारवाईत एकुण तीन लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तर दोघांविरूद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, गणेश भिंगारदे, सोमनाथ झांबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





