पुण्यात शिवाजीनगरमध्ये आगीची घटना
चेंबूरच्या अमर महल विभागात दोन दुकानांना भीषण आग

मुंबई : पुण्याचा शिवाजीनगरमध्ये आगीची घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबईतून आगीची घटना समोर आली आहे. मुंबईतील चेंबूरच्या परिसरात ही आगीची घटना घडली आहे. यामुळे आजुबाजूचा परिसर रिकामा केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या अमर महल विभागात असलेल्या दोन दुकानांना भीषण आग लागली आहे. फर्निचर दुकानासह सायकलच्या दुकानाला आग लागल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावर अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दुकानाला आग लागल्यामुळे आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच, शिवाजीनगरमधील हॉस्पिटलजवळ भीषण आग!
अमर महल विभागात लागलेल्या आगीमुळे परिसरात घबराट पसरली होती. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन अधिक गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहोचले होते. प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी घडलेली आगीची ही दुसरी घटना आहे. याआधी रेल्वेच्या डब्ब्याला आग लागली होती. लोअर परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये रेल्वे डब्याला आग लागली होती. दुरुस्तीच्या कामादरम्यान रेल्वे डब्याने पेट घेतला होता. आगीत कोणीही जखमी नसल्याची रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर ताबा मिळवला आहे. मेन्टेनन्स डेपोत डब्याला आग लागल्याने सुदैवाने रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम नाही झाला.





