मावळच्या मातीत अनुभवायला मिळणार रायडर्सच्या ‘डर्ट-रेसिंगचा’ थरार

मावळ : फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारतातील मोटर स्पोर्ट्सच्या राष्ट्रीय प्रशासकीय संस्थेच्या मान्यतेखाली होणार्या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम फेरी कामशेतजवळ नाणोली येथे होणार आहे. भारतातील अव्वल आणि सर्वोत्तम रायडर्स या राष्ट्रीय विजेता ठरवणार्या फायनलमध्ये सहभागी होणार असून या टु-व्हिलरच्या डर्ट-रेसचा थरार अनुभवता येणार आहे. रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही
या स्पर्धेबाबत माहिती देताना एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना यांनी सांगितले की, २०२४ मध्ये देशातील विविध रांज्यांमध्ये झालेल्या ५ प्राथमिक फेर्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी १४ आणि १५ डिसेंबर रोजी नाणोली स्पीड-वे फार्म्स येथे होणार आहे. या फायनल राऊंडसाठी प्रत्येक झोनमधून पात्र झालेले सुमारे १५० अव्वल रायडर्स सहभागी होणार आहेत.
फराद म्हणाले की, माझे आई-वडील, बहीण आणि भाऊ असे संपूर्ण कुटूंबच रेस आणि रॅली करत असून माझे हे कुटूंब मोटरस्पोटर्स आयकॉन्स् म्हणून ओळखले जाते. भारत आणि दक्षिण-पुर्व आशियातील २०० हून अधिक रॅली आणि शर्यतींमध्ये भाग घेतला आहे. बीबीसी टॉप गीअर इंडिया यांनी देशातील आतापर्यंतच्या १० सर्वोत्तम ड्रायव्हर्समध्ये स्थान दिले आहे.
हेही वाचा – अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबादमधून अटक; नेमकं कारण काय?
राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले सचिन डी., नटराज, असद खान, रेहाना, सिनान फ्रान्सीस, राजेंद्र, स्टेफन रॉय, शामिम खान आणि सय्यद असिफ अलि हे विजेतेपदासाठी झुंझणार आहेत. याशिवाय सुहैल अहमद, युवा कुमार, अमोद नाग, मुंबईचा बादल दोशी, पुण्यातील पिंकेश ठक्कर, हंसराज साईकिया, मधुरीया ज्योती राभा, बंटेलांग जयव्रा असे अव्वल आणि सर्वोत्तम १५० हून अधिक रायडर्स सहभागी होणार आहेत. असे फराद आणि चिन्मय यांनी सांगितले.
इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेत प्रत्येक टप्पा ६ ते १० किलोमीटरचा असतो. यामध्ये रायडर्स मातीच्या, डांबरी ट्रकवर किंवा डोंगरातील उंच-सखल खडतर अशा रेसिंग मार्गावर आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करत अंतिम रेषा गाठतात. हाय-स्पीड घेण्यासाठी उत्तम असा सरळ रस्ता किंवा वेड्यावाकड्या वळणांचा घाट रस्ता, या मार्गावरून अचूक नियंत्रण, हवेतून उंच उडी मारून पुन्हा नियंत्रण मिळवणे अशा अनेक आव्हानांचा यशस्वी सामना करून रायडर्स आपली रेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. रॅली स्प्रिंटमध्ये बाईक्स्च्या विविध श्रेणींचा समावेश आहे. विशेषकरून सुधारित बाईक्सपासून ते स्ट्रीट बाईक्सपर्यंत रायडर्स वेगवेगळ्या गटात स्पर्धा करतो.




