लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? भाजपाने मांडली भूमिका

Ladki Bahin Yojna | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की, राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यास या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला २,१०० रुपये देऊ. त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात २,१०० रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे. अशातच महाराष्ट्र भाजपामधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?
आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा – अभिनेता विक्रांत मेस्सीचा अभिनयातून संन्यास! सोशल मीडियावर दिली माहिती
वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.





