महायुती सरकारमध्ये पिंपरी- चिंचवडला मंत्रीपद मिळणार!
उद्योगक्षेत्राला चालना अन् राजकीय संतुलन साधण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या चौघांपैकी एकाला उद्योगमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष अतुल इनामदार यांनी आज (रविवारी) भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीनेही हीच मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांनी व उद्योजकांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी अतुल इनामदार यांच्यासमवेत भाजपच्या उद्योग आघाडीचे शहर उपाध्यक्ष श्रीपती खुने, महिला शहरप्रमुख उत्कर्षा कुलकर्णी, बॉण्ड संस्थेचे संस्थापक जितेंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आदी मान्यवर होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे तसेच अमित गोरखे यांचा मंत्रिपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये समावेश आहे. या चौघांपैकी एकाला एकाला उद्योग मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन यावेळी फडणवीस यांना देण्यात आले.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. येथील उद्योगांचे व्यवस्थापन, वाढ, आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणे हे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पिंपरी-चिंचवडमधील आमदाराला मंत्रिमंडळात स्थान देऊन उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा – राज्यातील व्यवावसायिकांना गुलाबी झटका : सिलिंडरच्या दरामध्ये पुन्हा वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला चटका!

पिंपरी-चिंचवड शहराला उद्योग खात्याचे मंत्रिपद दिल्यास पुढील फायदे होऊ शकतील.
औद्योगिक क्षेत्राला स्थानिक नेतृत्व:
स्थानिक आमदारांना औद्योगिक क्षेत्रातील आव्हाने आणि गरजा अधिक चांगल्या प्रकारे माहीत असतात. यामुळे, स्थानिक स्तरावर उपयोजन आणि धोरणे अधिक प्रभावीपणे राबवता येतील.
औद्योगिक विकासाला चालना:
उद्योग खात्याच्या मंत्रिपदाद्वारे पिंपरी-चिंचवड क्षेत्रासाठी विशेष औद्योगिक धोरणे तयार करता येतील, ज्यामुळे क्षेत्राला जागतिक पातळीवर ओळख मिळेल.
तरुणांना रोजगाराच्या संधी:
औद्योगिक विकासामुळे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. स्थानिक आमदार मंत्रिपदावर असल्यास, या क्षेत्रातील कौशल्यविकासावर अधिक भर दिला जाईल.
स्थानिक प्रश्नांची सोडवणूक:
उद्योग क्षेत्रातील प्रदूषण, वाहतूक व्यवस्थापन, आणि इतर मुद्द्यांना मंत्रिमंडळात थेट आवाज मिळू शकेल.
राजकीय संतुलन:
पुणे जिल्ह्याचे राजकीय वजन वाढण्यासाठी पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रातून नेतृत्व असणे गरजेचे आहे.
या सर्व बाबी लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडच्या आमदाराला उद्योग खात्याचे मंत्रिपद दिल्यास, राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असे फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अशी माहिती अतुल इनामदार यांनी माय पुणे सिटीशी बोलताना दिली.




