आघाडीच्या बैठकीला शिवसेनेची दांडी

पुणे : महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून शिवसेना आणि काॅंग्रेसच्या राज्यातील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. याचे परिणाम पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीवरही दिसून आले. काॅंग्रेस भवनमध्ये बोलविण्यात आलेल्या बैठकीस शिवसेनेच्या दोन्ही शहर प्रमुखांनी दांडी मारली.
तर, याबाबत विचारणा केली असता निरोप उशिरा मिळाल्याने जाता आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात राज्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वादामुळेच शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल
विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून ताणाताणी सुरू आहे. “जागा वाटप पूर्ण झाले असून काही जागांवर तिढा आहे,असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाक् युद्ध सुरू आहे. तर, शिवसेनेचे नेते संजय राऊतही काॅंग्रेसवर सातत्याने तोंडसुख घेत आहेत.
त्यामुळे या वादांचे पडसाद स्थानिक पातळीवर पडत आहेत. शनिवारी काॅंग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी करण्यात येणारे शक्तिप्रदर्शन आणि प्रत्येक पक्षाकडून कशा प्रकारे प्रचाराचे नियोजन असेल, मेळावे, कार्यकर्ता बैठका कशा प्रकारे घ्यायच्या,
प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी इतर पक्षांच्या मतदारसंघात कशा प्रकारे प्रचारात सहभागी व्हायचे, प्रचार फेऱ्यांचे नियोजन कसे असावे यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीस काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित राहिले. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही शहर प्रमुख उपस्थित राहिले नाहीत.




