जालना-बीड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

Jalna Beed Accident | जालना बीड महामर्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बसमध्ये २५ ते ३० प्रवाशी प्रवास करत होते. त्यातले अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
जालना बीड महामार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याकडे जात असताना महामार्गावर मठतांडा जवळ बस येताच अंबड कडून बीडकडे मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसचा आणि ट्रकचा अक्षरश: चुराडा झालाय.
हेही वाचा – महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या कधी आणि किती रुपयांनी
अपघाता वेळी बस मध्ये 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आलीय. त्यात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाता नंतर परिसरातील नागरिकांनी अपघात ठिकाणी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढत त्यांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं. या अपघातात गंभीर जखमींना जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.




