थकीत वीजबिल ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय’ योजना

पुणे : वीजबिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने ‘अभय’ योजना २०२४ सुरू केली आहे. ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. १ सप्टेंबरपासून योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे.
हेही वाचा – किरीट सोमय्या भाजपवर नाराज? प्रचार समितीचं सदस्यत्व सोमय्यांनी नाकारलं
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५०४८ कोटी रुपयांची रक्कम, तसेच १७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणे आहे. या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येईल.
‘‘मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक, लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा,’’ असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने, महावितरणच्या मोबाईल ॲपवरून अभय योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक १९१२, १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल आणि त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.




