राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव माणिक दिवे यांना आयआयटी मुंबईकडून पीएचडी प्रदान
मुंबई येथील सभागृहामध्ये दीक्षांत समारंभ : सांगली जिल्ह्यातील सागावच्या सुपुत्राची कामगिरी

सांगली: सागाव (ता. शिराळा) येथील सुपुत्र आणि राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव माणिक दिवे यांना आयआयटी (भारतीय प्रौद्योगिकी संस्थान) मुंबईकडून पीएचडी प्रदान करण्यात आली.
आयआयटी मुंबईच्या सभागृहात झालेल्या ६२ व्या दीक्षांत समारंभामध्ये अशोक काळबाग, डॉ. आनंद राव, डॉ. बकुल राव, डॉ. अमित अरोरा यांच्याहस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. वेगाने नागरीकरण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा अभ्यास आणि असे नागरीकरण ओळखण्याची पध्दत या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना आयआयटी मुंबईचे डॉ. आनंद राव, डॉ. बकुल राव, यांचे मार्गदर्शन लाभले. माणिक दिवे सध्या राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव आहेत.
यापूर्वी त्यांनी तासगाव पंचायत समितीत गट विकास अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य निवडणूक आयोगात उपायुक्त तर पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.




