अजित पवार गटाकडून सर्व २८८ जागांवर सर्व्हे; विदर्भातील ‘इतक्या’ जागा लढणार

मुंबई | आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीकडून सावध पावलं टाकली जात आहेत. जागावाटपाबाबत अद्याप महायुतीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना अजित पवार गटानं मात्र २८८ जागांवर सर्व्हेचं काम सुरू केलं आहे. तसेच अजित पवार गटाकडून विदर्भातील जागांबाबत मोठं विधान करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं राज्यातील सर्व २८८ जागांवर सर्व्हे सुरू केल्याचं धर्मराव अत्राम यांनी म्हटलं आहे.
धर्मराव अत्राम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरू झालं आहे. २८८ जागांवर आमचा सर्व्हे चालू आहे. त्या दृष्टीने आम्ही चर्चा करायलाही बसलो होतो. आम्ही विदर्भातल्या ६० ते ६५ जागांपैकी १५ ते २० जागा लढवायला हव्यात, असं प्रफुल्ल पटेल यांचं मत आहे. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विदर्भातल्या अशा १५ ते २० जागा तपासत आहोत जिथे आम्हाला १०० टक्के यश मिळेल.
हेही वाचा – ‘छगन भुजबळ कलाकार तर शरद पवार मोठे..’; संजय राऊतांचं विधान चर्चेत
अनिल देशमुखांविरोधात आम्ही उमेदवार देणार आहोत. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा मोठा त्यांच्याचकडचा एक उमेदवार आहे. त्यांच्या कुटुंबातला, त्यांच्या नातेवाईकांमधला सक्षम उमेदवार आमच्याकडे आहे, असंही धर्मराव अत्राम म्हणाले. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूक संग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





