Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

महिलांसाठी १६५ जागा ‘हॉटस्पॉट’!

पुणे : शहरातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १६५ ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने संवेदनशील असलेले हे ‘हॉटस्पॉट’ शोधून काढले आहेत. यामध्ये सर्वाधिक संवेदनशील ‘हॉटस्पॉट’ हे अनुक्रमे शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आहेत. यासोबतच शहरातील पाचही  परिमंडळांमध्ये सर्वाधिक ‘हॉटस्पॉट’ अनुक्रमे परिमंडळ चार, पाच आणि एकच्या हद्दीत आढळून आले आहेत.

शासनाच्या निर्णयानुसार पुण्यामध्ये २०१५ साली पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या ‘महिला सुरक्षा समिती’च्या वतीने या ठिकाणी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने काराज्य शासनाने महिलांच्या सुरक्षा संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व पोलीस दलांना २०१५ साली महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या आदेशानुसार तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २०१५ साली ‘महिला सुरक्षा समिती’ स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ ही समिती ‘डी ॲक्टिव्हेट’ असल्याचे समोर आले होते.

महिला आणि मुलींच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांची यादी तयार करून या ठिकाणांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याची महत्त्वाची जबाबदारी समितीवर असते. ही समिती स्थापन झाल्यानंतर पोलीस आयुक्तालयामध्ये या संदर्भात दर महिन्याला बैठकादेखील होत होत्या. परंतु, त्यामध्ये काही काळ खंड पडलेला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर या समितीच्या कामाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. या समितीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून पोलीस आयुक्तांकडून या विषयी बैठका घेऊन आवश्यक सूचना केल्या जात आहेत.

या समितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच पुणे महापालिकेचे अधिकारी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी नागरी सेवा सुविधा पुरवणाऱ्या खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात महिला मार्शल नेमले आहेत. पोलिसांचे दामिनी पथकही पोलीस ठाणे स्तरावर काम करीत आहे. गुन्हे शाखेच्या भरोसा सेल मार्फतही दामिनी काम करीत आहेत. शासनाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या या समितीमार्फत शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, निर्जन स्थळे, बागा, महाविद्यालयांचे परिसर, शाळांचे परिसर, कामाची ठिकाणे, बस व रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, जीम आदी ठिकाणी असणाऱ्या सुरक्षेची नियमित पाहणी आणि त्यावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते.

हेही वाचा –  अपघातग्रस्तांना मदत करा’; 300 शब्दांच्या निबंधात काय लिहिले?

या ठिकाणी रात्रीच्या वेळी आवश्यक विजेची उपलब्धता, सुरक्षारक्षक आहेत की नाही, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत की नाही, निर्जन स्थळांवर, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त असते का? महिलांना सुरक्षित वाटते का, हे पाहून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश वेळोवेळी संबंधित विभागांना देण्यात येतात. शहरातील कोणत्या जागा महिलांसाठी सुरक्षित नाहीत, त्यांचीही पाहणी या उपक्रमाअंतर्गत करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या जातात. या समितीमध्ये सर्व विभागांचे अधिकारी असल्याने आपापल्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर केल्या जाव्यात असा त्यामागील हेतू आहे. ज्या रस्त्यांवर कमी प्रकाश आहे, तेथील प्रकाश व्यवस्था वाढवणे, पदपथ सुरक्षित करून घेणे, भुयारी मार्गांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये दारे, खिडक्या व्यवस्थित करून घेणे तसेच तेथेही प्रकाशव्यवस्था निर्माण करणे अशी कामे  पालिका, महावितरण आणि पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून एकत्रितपणे केली जाणे अपेक्षित आहे. रोडरोमियो, फिरस्ते, मवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महिला मार्शलची गस्त सुरू करण्यात आली होती.

महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. शहरातील रस्त्यावरील तसेच अन्य ठिकाणांवरील वातावरण सुरक्षित राहावे यासाठी हे प्रयत्न करण्याच्या सूचना समितीला पोलीस आयुक्तांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता स्वयंसेवी संस्थांची आणि नागरिकांची मदत घेण्याचीही तजवीज ठेवण्यात आलेली आहे. तसेच, नागरिकांकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांनुसार यामध्ये बदल करण्यात येत आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये या संदर्भात महिन्यातून एकदा बैठक देखील घेण्यात येते. पालिकेची स्वच्छतागृहे, पथदिवे, भुयारी मार्ग, रात्रीच्या वेळी विविध भागांमधील सुरक्षा व्यवस्था आणि प्रकाश व्यवस्थाही पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. बागेमध्ये, टेकड्यांवर अंधारात बसणे, निर्जन स्थळी जाणे, जोडप्यांसाठी धोकादायक असते. कोणताही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरुणींनी खबरदारी बाळगण्याबाबत जागृती केली जात आहे. या सर्व कामांचा आढावा महिला सुरक्षा समितीच्या बैठकांमधून घेतला जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

 

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button