Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आता अधिकारी, कर्मचा-यांच्या स्वाक्षऱ्या मराठी भाषेतून

पिंपरी :  महापालिकेतील सर्व प्रशासकीय कामकाज(PCMC) मराठी भाषेतून करण्यात यावे, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी कर्मचा-यांना अवगत करून आपल्या विभागातील सर्व कामकाज आणि अधिकारी कर्मचा-यांच्या स्वाक्षऱ्या मराठी भाषेतून होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना महापालिका प्रशासन विभागाच्या वतीने सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

महापालिका कामकाज आणि व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व प्रशासकीय कामकाजात तसेच व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याबाबत सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व कामकाज मराठी भाषेत होईल याची दक्षता घ्यावी,असे परिपत्रक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत सर्व विभागांना निर्गमित करण्यात आले आहे.

हेही वाचा  –  वसंत मोरे पुन्हा ठाकरेंसोबत, राज ऐवजी उद्धव ठाकरेंना साथ देणार

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर सक्षमपणे व्हावा यासाठी महापालिकेकडून राबविल्या जाणा-या योजनांची माहिती, दूरध्वनीवर बोलणे, जनतेशी पत्रव्यवहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सभेतील भाषण, अधिकारी व कर्मचारी यांची स्वाक्षरी मराठी भाषेत असणे बंधनकारक असणार आहे.

महापालिकेमार्फत नागरिकांपर्यंत जाणारे नमुने, पत्रके, परवाने, प्रपत्र, नियमपुस्तिका, सर्व प्रकारच्या टिप्पण्या, नस्त्या, शेरे, अभिप्राय, धोरणे, आदेश, अधिसूचना, प्रारूप नियम, अहवाल, निमंत्रण पत्रिका, निविदा, बैठकांचे कार्यवृत्ते, कार्यालयातील नामफलक तसेच संकेतस्थळे आदी मराठी भाषेत असणे आवश्यक असणार आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणारी माहिती तसेच राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर विभागाची माहिती सर्वांच्या निदर्शनास आणणे आवश्यक असल्यास अशी माहिती मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच वर्जित प्रयोजनांतर्गत येणाऱ्या समित्या, अभ्यास गट यांना यामध्ये सुट देण्यात आले असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button