‘अहंकारी होते, त्यांना प्रभू रामाने २४० वर अडवलं’; संघाची भाजपावर टीका

मुंबई | लोकसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर ३७० आणि एनडीए म्हणून ४०० खासदारांचा टप्पा पार करेल, अशी घोषणा भाजपा नेत्यानी केली होती. मात्र भाजपला २४० जागांवर मर्यादीत राहावे लागले. या लोकसभेच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करणारे भाष्य केले होते. त्यानंतर आता इंद्रेश कुमार यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.
इंद्रेश कुमार म्हणाले, ज्यांनी आजवर प्रभू रामाची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. ज्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले, त्यांना प्रभू रामाने २४० जागांवर अडवले. त्यांचा अहंकार यासाठी कारणीभूत ठरला. ज्यांनी प्रभू रामावर श्रद्धा ठेवली नाही. प्रभू रामाला विरोध केला. त्यांनाही २३४ वर मर्यादित राहावे लागले. देवाचा न्याय असा असतो, असं म्हणत त्यांनी काँग्रसलाही टोला लगावला.
हेही वाचा – ‘शरद पवारांपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत सगळे आमच्या पंगतीत जेवून गेले’; भाजप नेत्याचं विधान चर्चेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लोकसभेच्या निकालानंतर भाष्य केलं. ते म्हणाले, लोकशाहीत निवडणूक ही अनिवार्य प्रक्रिया आहे. यात दोन पक्ष असल्याने स्पर्धा राहायला हवी. मात्र, हे युद्ध नाही. प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता निवडणुका आटोपल्या असून ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यायला हवे. एक खरा सेवक काम करताना शिष्टाचार राखतो. शिष्टाचार राखताना तो अविचल राहतो. ‘मी हे केले, ते केले’ असा कोणताही श्रेयवाद करत नाही. सेवक कधीच अहंकार दाखवत नाही. तो नेहमी शिष्टाचार पाळतो. फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.




