पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय मिळाला.!
प्रत्येक खातेदाराला चार एकर जमीन देण्याचा निर्णय

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांच्यासमवेत संयुक्त बैठक
तळेगाव दाभाडेः मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात अधिकारी व धरणग्रस्त शेतकरी यांच्यासमवेत संयुक्त बैठक आज पार पडली. ‘प्रत्येक खातेदाराला चार एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी दिला असून दोन एकर क्षेत्र मावळ तालुक्यात व दोन एकर क्षेत्र दुसऱ्या तालुक्यात देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
मावळच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या व धरणग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वतीने महायुती सरकारचे आमदार सुनील शेळके यांनी आभार मानले.
बैठकीत झालेले सकारात्मक निर्णय :-
१. पवना धरणग्रस्त प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप करण्यात येणार.
२. दोन एकर क्षेत्र धरण परिसरात देण्यात येणार.
३. दोन एकर क्षेत्र जिल्ह्याच्या इतर ठिकाणी.
४. एकूण ७६४ खातेदारांना सुमारे १८३९ एकर क्षेत्रापैकी १५२८ क्षेत्र पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे.तसेच सुमारे ३११ एकर क्षेत्रामध्ये रस्ते,ओढे, नाले, वने व धरण सुरक्षेकरिता क्षेत्र ठेवले जाणार आहे.
५. ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत परंतु ते खातेदार नाहीत,अशा शेतकऱ्यांना देखील समाविष्ट केले जाईल.त्या शेतकऱ्यांनी सर्व माहिती व कागदपत्रांसह पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण प्रस्ताव आठ दिवसांमध्ये पुनर्वसन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पुढील आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश मा.मंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यानंतर पुढील आठ दिवसात अंमलबजावणी केली जाईल.
“सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पवना धरणासाठी मावळातील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या.या प्रकल्पातील काही बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले.परंतु उर्वरित खातेदार मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होते. हा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागील चार वर्षांपासून आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. अधिवेशनात देखील हा प्रश्न त्यांनी मांडला, मंत्रालय स्तरावर तसेच विभागनिहाय संयुक्त बैठका घेतल्या. अनेक आंदोलनात ते सहभागी झाले.अखेर आज झालेल्या बैठकीत पुनर्वसन मंत्री यांनी शिक्कामोर्तब केले आणि शेतकऱ्यांसोबत घेतलेल्या प्रयत्नांना सकारात्मक यश मिळाले आहे.”
बैठकीस यांची उपस्थिती…
याबैठकीस आमदार सुनील शेळके, पवना धरणग्रस्त संयुक्त समितीचे अध्यक्ष नारायण बोडके, संजय खैरे, बाळासाहेब मोहोळ, लक्ष्मण काळे, मुकुंदराज काऊर, संतोष कडू, दत्तात्रय ठाकर, रामभाऊ कालेकर आदी स्थानिक शेतकरी व सर्व विभागाचेअधिकारी उपस्थित होते.




