Pune Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाच्या आईला बेड्या, पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे | पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. आता या प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईला अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याची बातमी समोर आली. त्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते त्याची आई शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली, अपघाताचा कलंक कुणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस त्यांना चौकशीदरम्यान विचारु शकतात. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर शिवानी अग्रवाल बेपत्ता झाल्या होत्या. मात्र पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली.
हेही वाचा – आज अखेरच्या टप्प्यात ५७ जागांसाठी मतदार देणार कौल
अल्पवयीन मुलाने पोर्श बेदरकारपणे चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. यानंतर या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला १५ तासांत जामीन मिळाला. यावरुन समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे.





