चिखली भागातील सोसायट्यांमधील विस्कळीत पाणीपूरवठा सुरळीत व्हावा

- चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवदेन
पिंपरीः चिखली भागातील पाटील नगर, बगवस्ती, देहू-आळंदी रोड वरील सर्वच सोसायट्यांना, तसेच चिखलीमधील देहू-मोशी रोडवरील रिव्हर रेसिडेन्सी, ऐश्वर्यम हमारा सोसायटी, क्रिस्टल पर्ल, मिलेनियम पॅरामाऊंट या इतर आजूबाजूंच्या सर्व सोसायट्यांना मागील 15 दिवसांपासून खूप कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. फ प्रभागातील पाणीपूरवठा विभागाच्या व पिंपरी चिंचवड मनपातील पाणीपूरवठा विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना याबाबत पाठपूरावा करून देखील कोणतीही सुधारणा झालेली नाही. परिणामी चिखली भागातील सोसायट्यांमधील विस्कळीत पाणीपूरवठा सुरळीत व्हावा, या मागणीचे निवेदन चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्यावतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, पाणीपूरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन पाणीपूरवठा सुरळीत करावा. पुढील दोन दिवसात चिखलीमधील सर्व सोसायट्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आपल्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना गोट्या खेळत बसण्यासाठी गोट्या वाटपाचा कार्यक्रम केला जाईल, तसेच आपल्या कार्यालया समोर आमच्या सर्व महिला महिला भगिनींना घेऊन हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आमच्या सर्वच सोसायट्यांमधील सदस्य प्रामाणिकपणे टॅक्स भारतात. तरी आम्हालाच प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरवठा कमीप्रमाणात केला जातो ही खेदाची बाब आहे. कुठेतरी पिंपरी-चिंचवड मनपाच्या पाणीपूरवठा अधिकाऱ्यांची आणि टँकर लॉबीची मिलीभगत यामागे आहे, असे वाटते म्हणूनच कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.
-संजीवन सांगळे, अध्यक्ष-चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन.





