TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, एकतर्फी होणाऱ्या या लढतीत मतदारांना घराबाहेर काढण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल. मतदारांमधील निरुत्साहामुळेच शिवसेनेने आपल्या हक्काच्या मतदारांना मतदानाकरिता बाहेर काढण्याकरिता कार्यकर्त्यांची फौज सज्ज ठेवली आहे.

पोटनिवडणुकीत एरव्हीही निरुत्साह असतो. सर्वसाधारण निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमीच असतो. अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणुकीतील चुरस संपली. तसेच भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणूक होणारच नाही, असे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरच मतदान किती होते याची शिवसेनेला चिंता आहे. जास्तीत जास्त मताधिक्याने ही जागा जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आपले हक्काचे मतदार घराबाहेर पडावेत म्हणून शिवसेनेने आजूबाजूच्या परिसरातील शिवसैनिकांना अंधेरीत पाठविले आहे. घरोघरी जाऊन मतदानासाठी बाहेर या, असे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करणार आहेत. 

पोटनिवडणुकीतील चुरस संपल्याने मतदारांमध्येही निरुत्साह जाणवतो. तरीही आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाकरिता बाहेर यावे, असे आवाहन केले आहे, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. मतदारांना घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान असेल. महाविकास आघाडीचे हक्काचे मतदार घराबाहेर पडतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

मरोळ येथील शाळेत सखी मतदान केंद्र

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंधेरी परिसरातील मरोळ-मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्युकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर एकूण १,४१८ मतदार असून त्यापैकी ७२६ मतदार महिला आहेत, तर ६९२ मतदार पुरुष आहेत. महिला मतदार जास्त असल्यामुळे हे केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले असून हे केंद्र विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असतील.

अडीच लाख मतदार२५६ मतदान केंद्रे

या मतदारसंघात एकूण अडीच लाखांहून अधिक मतदार असून २५६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यात चार अपक्ष आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी साधारण १ हजार ६०० कर्मचारी कार्यरत असतील. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दल, राखीव पोलीस दल, निमलष्करी दल, गृहरक्षक दल यांचा समावेश असणार आहे. मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून या विभागात पैशाचे वाटप झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही, तसेच या भागात एकही संवेदनशील मतदारसंघ नसल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. मतमोजणी रविवारी होणार आहे.

पुरुष मतदार – १ लाख ४६ हजार ६८५

महिला मतदार – १ लाख २४ हजार ८१६

तृतीय पंथीय मतदार – शून्य

एकूण मतदार – २ लाख ७१ हजार ५०२

अपंग मतदार – ४१९

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button