नेरळ-माथेरान मार्गावर डेमू मिनी ट्रेन; मध्य रेल्वेचा प्रस्ताव

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन येत्या २२ ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत येत असतानाच या मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा डब्यांची डेमू मिनी ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्याकडे मध्य रेल्वेने प्रस्ताव पाठविला आहे. डेमू गाड्यांमुळे रुळावरुन गाडी घसरण्याचा घटनांना आळा बसणार आहे.
गेल्या तीन वर्षापासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा २२ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दिवसभरात अप व डाऊन अशा चार फेऱ्या होतील. नेरळ ते माथेरानबरोबरच अमन लाॅज ते माथेरान अशा शटल सेवाही चालवण्यात येतात. सध्या प्रत्येकी सहा डब्यांच्या तीन मिनी ट्रेन असून त्या डिझेल इंजिनावर धावतात. त्या गाड्या चालवताना पुढे आणि मागील डब्यांना आणखी एक इंजिनही जोडले जाते. दुसरे इंजिन जोडताना त्याला काहीसा विलंब होतो. त्यातच मिनी ट्रेन चालवताना डब्यांना धक्केही बरेच बसतात. तांत्रिक समस्या उद्भवल्याने ही गाडी रुळावरुनही घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सहा डब्यांची डेमू गाडी चालवण्यासाठीचा प्रस्ताव चेन्नईतील रेल्वे कारखान्याकडे पाठविला असून दार्जिलिंग हिमालयीन मिनी ट्रेन प्रमाणे गिअर व ट्रोली असलेले डब्बे बांधण्यासही सांगण्यात आले आहे.
अमन लाॅज-माथेरान-अमन लाॅज अशा अतिरिक्त शटल फेऱ्या २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंच चालवण्यात येणार आहेत. सकाळी ९.१० वाजता, दुपारी १२.५० वा आणि सकाळी ९.५३ वा, दुपारी १.३३ वाजता या फेऱ्या होतील.





