दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय उद्या ‘मेगाब्लॉक’ नाही

दिवाळीनिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय उद्या ‘मेगाब्लॉक’ नाही

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून विविध तांत्रिक कामांसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र या रविवारी दीपावलीनिमित्त लोकल गाडय़ांमध्ये प्रवाशांची गर्दी होणार असल्याने या दिवशी मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. मात्र, या दिवशी रविवार वेळापत्रक लागू राहणार असून नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आदींच्या दुरुस्तीसाठी दर रविवारी मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात येतो. या दरम्यान नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवतानाच त्याव्यतिरिक्त आणखी लोकल फेऱ्याही रद्द केल्या जातात. या रविवारी दीपावलीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असेल. त्यामुळे लोकल गाडय़ांना गर्दी होण्याची शक्यता असल्याने मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेनेही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रविवार वेळापत्रक लागू राहणार आहे. या दिवशी नेहमीपेक्षा कमी लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. तसेच आणखी लोकल फेऱ्या मात्र रद्द करण्यात येणार नाहीत.

रविवारी मध्य रेल्वेवर १ हजार ८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. रविवारी सुमारे १,४०० लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत असणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर दररोज होणाऱ्या १ हजार ३८३ लोकल फेऱ्यांपैकी कमी फेऱ्या होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागेल, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *