जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांना मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी
सुसागाव येथे दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण झाली. सहा जणांनी मिळून एका महिलेला, तिच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी साडेआठ वाजता घडली.
याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्चना भगवान पवार, नीलाबाई पोपट मोहिते, अनिता हरीश चव्हाण, कविता दिलीप मोहिते, हरीश भगवान चव्हाण, भगवान नाना पवार (सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. रविवारी सकाळी साडेआठ वाजता आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले. शनिवारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांच्या सासूचे डोक्याचे केस पकडून आरोपींनी मारहाण केली. आरोपी अनिता चव्हाण हिने घरातून मिरची पूड आणून टी फिर्यादी यांच्या डोक्यात टाकून मारहाण केली.
आरोपी अर्चना पवार हिने दगडाने मारले. फिर्यादी यांचे पती भांडण सोडविण्यासाठी आले असता भगवान पवार याने फिर्यादी यांच्या पतीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.





