पिंपरी / चिंचवड

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून

पिंपरी l प्रतिनिधी

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून करण्यात आला. ही घटना चिंचवडेनगर, चिंचवड येथे रविवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

ज्ञानदेव श्रीरंग साठे (रा. चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याबाबत मयत ज्ञानदेव यांची भाची रोहिणी गोकुळ गायकवाड (वय 25, रा. चिंचवड) यांनी रविवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुन रावत मुलीमनी (वय 36, रा. निगडी, प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडेनगर, चिंचवड येथील कृष्णा हॉटेलच्या पाठीमागील बाजूस शंकर चिंचवडे यांच्या पार्किंगमधील मोकळ्या मैदानात एकजण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी व्यक्‍तीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

मयताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली. त्यावेळी मयताचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत संशयित आरोपी अर्जुन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. आपल्या नातेवाइक महिलेसोबत मयत ज्ञानदेव याचे अनैतिक संबंध असल्याने आपण त्याचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button