तळेगाव-चाकण रोडवर पादचारी महिलेला कार ट्रेलरची धडक : महिलेचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी
तळेगाव-चाकण रोडवर खालूंब्रे येथे कार ट्रेलरने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरात धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी सहा वाजता घडली.
द्रोपदा भगवान राऊत (वय 40) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती भगवान ग्यानबा राऊत (वय 50, रा. तळवे वस्ती, खालूंब्रे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार ट्रेलर ( एन एल 01 / ए एफ 2552) चालक वाजीद रहमान खान (वय 44, रा. श्रीसिंघलेहरी, हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी द्रोपदा चाकण एमआयडीसी महाळुंगे येथील लॉरेल कंपनीत काम करत होत्या. सोमवारी सकाळी सहा वाजता त्या रिक्षाने कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या. कंपनीत जाण्यासाठी त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी आरोपी कार ट्रेलर चालकाने त्यांना धडक दिली. त्यात द्रोपदा गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.




