अमित शहा आज नांदेड दौऱ्यावर; राजकीय वर्तुळाचं लक्ष

नांदेड – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजप नेतृत्वाने मोठे बदल केले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार का? असे भाकित वर्तविले जात आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा हे आज (ता.१७) महाराष्ट्रात येत असून नांदेड जिल्ह्यात त्याचा दौरा आहे. सीआरपीएफने आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहीमेत अमित शहा सहभागी होणार आहेत. तसंच सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमधील नेत्यांची ईडीकडून चौकशीबाबत अमित शहा काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
अमित शहा नांदेडमध्ये; भाजप नेत्यांना भेटणार का?
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काल (ता.१६) मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दोन तीन दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणासह राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांमधील नेत्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अमित शहा या दौऱ्यात राज्यातील भाजप नेत्यांना भेटणार का? तसंच अमित शहा काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
अमित शहा हे आज (ता.१७) नांदेडसह तेलंगणातील निर्मल जिल्ह्याचाही दौरा करणार आहेत. ‘तेलंगण मुक्ती दिना’निमित्त भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. तेलंगण मुक्ती दिन म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसंच अमित शहा हे यावेळी रक्तदान शिबिराचंही उद्घाटन करणार आहेत. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.





