कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते : जगन्नाथ नेरकर

- स्लग : सोहम ग्रंथालयातर्फे वायुसेनेत निवड झाल्या बद्दल आदिती कटारे यांचा सन्मान
पिंपरी | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांने ठरविले तर कोणतेही क्षेत्र अवघड नसते. कठोर परिश्रम केल्यास यश नक्की मिळते. मुलींना तिनही सैन्य दलात खूप संधी उपलब्ध आहेत. सोहम अभ्यासिकेतून यापूर्वी १६ अधिकारी प्रशासकीय सेवेत निवडले गेले आहेत. लवकरच मिलिटरी सर्व्हिसेसमधील संधीबाबत मार्गदर्शन व पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी केले. आदिती कटारे हिची देशभरातून वायूसेनेत नुकतीच गुणवत्तेवर निवड झाली. त्या निमित्ताने सोहम सार्वजनिक ग्रंथालयात नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नेरकर बोलत होते.
नेरकर म्हणाले की, संत तुकाराम नगरमधील सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका अत्यंत मार्गदर्शक व महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. यापुढेही देशाच्या प्रशासनातील तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी घडावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नेरकर म्हणाले. नगरसेविका सुजाता पालांडे यांनी आदिती कटारे यांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी किरणा सुवर्णा व्यापारी संघ अध्यक्ष कल्याण कटारे, मंजुषा कटारे, सुरेश पवार, वर्षा बोरसे, ग्रंथपाल निर्मला नेरकर, सुमन नेरकर व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रदीप बोरसे यांनी केले. वर्षा बोरसे यांनी आभार मानले.





