संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज, शहरातील 20 ‘सीसीसी’मध्ये 2017 बेड रिकामे

पिंपरी चिंचवड | शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली. तरी, संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आत्तापासूनच खबरदारी घेतली आहे. यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवली आहेत. शहरातील 20 ‘सीसीसी’ सेंटरमध्ये 2 हजार 17 बेड रिकामे आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. सप्टेंबर 20 मध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली. त्यानंतर पाच महिने रुग्णसंख्या स्थिर राहिली. फेब्रुवारी 21 च्या मध्यात अचानक रुग्णवाढ सुरु झाली. कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. बेडअभावी रुग्णांची धावधाव झाली. ऑक्सीजनचीही कमतरता जाणावत होती. प्रशासनाची मोठी तारांबळ झाली. जूनमध्ये दुसरी लाट ओसरली. रुग्णसंख्या नियंत्रणात आली. सध्याही रुग्णवाढ नियंत्रणात आहे.
आता ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन लाटांचा अनुभव असल्याने तिसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोविड केअर सेंटर सज्ज ठेवले आहेत. शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये, म्हणून महापालिकेने रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय देणे बंद केले आहे. ज्या रुग्णांना खूप अडचण आहे. अशाच रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे.शहरात सद्यस्थितीत वीस कोविड केअर सेंटर सुरू आहेत. यामध्ये सद्यस्थितीत 160 रुग्ण उपचार घेत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी संभाव्य तीसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तसेच संभाव्य तिसरी लाट आली तर उपाययोजना म्हणून कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. शहरात कोविड केअर सेंटर बरोबरच महापालिका रुग्णालयातदेखील कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांना रुग्णालयात तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.
लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड!
पुढील काही महिन्यांमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी वायसीएम आणि जिजामाता रुग्णालयात स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आले आहेत.





