सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

नवी दिल्ली – देशातील जवळपास सर्वच शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेल शंभरी पार करण्याच्या तयारीत आहे. मात्र आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या आठवड्यात शनिवारी डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती, तर पेट्रोलच्या किंमतीत 29 ते 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
देशाच्या राजधानीत आज पेट्रोल 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 107.83 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.45 रुपये प्रति लिटरने विकण्यात येत आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 102.08 रुपये, तर डिझेलची किंमत 93.02 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
दरम्यान, पेट्रोलच्या दरांत 4 मेनंतर 41 वेळा वाढ झाली असून डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली आहे, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाबसह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरीपार पोहोचल्या असून उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरने महाग झाले आहे. तर डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.





