ऑक्सिजन अभावी मृत्यूंवरून राजकारण जोमात, केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा विरोधकांचा निर्णय

नवी दिल्ली: ऑक्सिजन अभावी देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असं उत्तर काल केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं होत. यावरुन आता देशभरात राजकारण तापलं असून विरोधक प्रचंड संतापले आहेत. काँग्रेस आणि आपकडून केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या दाव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. ऑक्सिजनअभावी देशातील प्रत्येक राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिला होता.
ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला धक्का बसल्याचं विधान केलं आहे. ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्यांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ते सत्य आहे, असंही ते म्हणाले.





