पूजा चव्हाणच्या आईवडिलांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, म्हणाले…
मुंबई – पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. अखेर काल राठोडांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
या प्रकरणात संजय राठोड यांच्या अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. तसेच त्यांचे अनेक फोटो देखील समोर आले आहेत. पूजाच्या आईवडिलांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेत या प्रकरणात होणारी बदनामी थांबवावी अशी मागणी केली आहे. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात होणारी चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र –
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
आमची मुलगी कु. पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्देवी मृत्यू झाला आहे. कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, आमची ही वेदना आता कधीही भरुन येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत.
आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील, त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे.आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरुन कोणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतू या आड राजकारण करुन दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करुन संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नये.
तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करुन न्याय द्यावा. परंतू संशयावरुन मुलीवर किंवा कोणावरही आरोप करु नये. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करुन येथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरुन त्याचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे आणि दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यालं.
आपले नम्र,
लहू चंदू चव्हाण (पूजाचे वडील)
मंदोधरी लहू चव्हाण (पूजाची आई)
दिव्याणी लहू चव्हाण (पूजाची बहीण)





