पेट्रोल, डिझेल आणि मद्यावर कृषी सेस लागणार; किंमतीत होणार मोठा बदल?

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला की प्रत्येकजण आपल्या क्षेत्रातील बदलांविषयी जाणून घेत असतात. त्याचप्रमाणे मद्यप्रेमीही मद्याची किंमत वाढणार की कमी होणार याकडे लक्ष देत असतात. यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा म्हणून मद्यावर आकारण्यात येणारा १५० टक्के अधिभार कमी करून १०० टक्क्यांवर करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी मद्यावर १०० टक्के कृषी सेस लावण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मद्याच्या किंमती स्वस्त होण्याऐवजी स्थिरच राहतील.
मद्य आणि संबंधित उत्पादनांवर 100 टक्के कृषी सेस लागू केल्याने आता हे सर्व पैसे केंद्र सरकारच्या हातात जाणार आहेत. यापूर्वी मद्यावर 150 टक्के कर असला तरी तो थेट केंद्र सरकारच्या हातामध्ये जात नव्हता. त्याची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी होत होती. मात्र, नव्या निर्णयामुळे हा कर थेट केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होईल.
पेट्रोल आणि डिझेलवरही सेस
मोदी सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार (Cess tax) लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोलवर 2.5 रुपयांचा तर डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस लागणार आहे. त्यामुळे शंभरीनजीक येऊन ठेपलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखीनच भडकण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी आणि स्पेशल एक्साईज ड्युटी दे दोन कर कमी करण्यात आल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीवर वाढीव सेसचा काही परिणाम होणार नाही, असेही सांगितले जात आहे.
गॅसचे दर बदलणार
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तसेच व्यवसायिक स्तरावरील गॅस वापराचे दर बदलतात. आजही गॅसचे नवीन दर जाहीर झालेत. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये गॅसदरांमध्ये काही बदल करण्यात आले नव्हते, तसेच, या महिन्यातही घरगुती गॅसच्या दरांमध्ये बदल झालेले नाहीत. नवी दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 694 रुपये, तर मुंबईत 720.50 रुपये इतकी असेल




