१० महिन्यांनंतर आज विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजली

सोलापूर – पौष महिन्यातील ‘पुत्रदा एकादशी’निमित्त आज विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास दोन लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात 10 महिन्यानंतर आज पहिल्यांदाच मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळतेय.
पंढरपुरातील भक्त निवास, मठ, धर्मशाळा, लॉज शनिवारपासूनच हाऊसफुल्ल झाले आहेत. २० जानेवारीपासून ऑनलाईन दर्शन पास सक्ती बंद केल्याने भाविकांनी दर्शनास येण्यासाठी प्राधान्य दिले आहे. दरम्यान, भाविकांची संख्या वाढत असल्याने कोरोनामुळे बिघडलेले आर्थिक चक्र आता व्यवस्थित सुरू होईल, अशी आशा पंढरपूरमधील व्यापारी कपिल देशपांडे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन सुविधा रद्द करून कोरोनाचे सर्व नियम पाळून 20 जानेवारी पासून दर्शन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. यामध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षा खालील लहान मुलांना मात्र प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत भाविकांना प्रवेश करतानाच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला आहे. मात्र भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती आहे.





