मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन, म्हणाले…
मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीला आमदार विनायक मेटे, बाबासाहेब पाटील, राजन घाग, ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील आदी नेते उपस्थित होते. सरकारने जाहीर केलेल्या पोलिस भरती, मराठा आरक्षण तसंच आरक्षणावरील यापुढची होणारी सुनावणी अशा महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्यशासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
पोलीस भरती प्रक्रियेत इडब्ल्यूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाचा कुठेही उल्लेख नव्हता. विनायक मेटे यांनी आक्षेप घेतल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीचा जीआर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.





