महाराजांची बदनामी, गुन्हा नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ; संभाजी ब्रिगेडची आता मंत्रालयावर ‘धडक’

पिंपरी / महाईन्यूज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदनामीप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्त पोलीस खाते व राज्य सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात उतरणार आहे. सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी सनदशिर मार्गाने पिंपरी-चिंचवड ते मंत्रालय अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरूवात होणार आहे. सहा दिवस सलग पायी अंतर कापत संभाजी ब्रिगेडचा हा मोर्चा मुंबई मंत्रालयात धडकणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे राष्ट्रपुरुष आहेत. कायद्यानुसार राष्ट्रपुरुषांची बदनामी अथवा त्यांच्याविषयीचा चुकीचा इतिहास पसरवण्याचे कृत्य गुन्हा ठरतो. श्री श्री रविशंकर यांच्याकडून महाराजांचा चुकीचा इतिहास पसरवण्यात आला आहे. रविशंकर यांनी कॅलेंडर, व्हिडिओ तसेच वृत्तपत्रातील लेखांच्या माध्यमातून महाराजांच्या पराक्रमाचा विपर्यास करून चुकीचा इतिहास पसरवला आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करून रामदास स्वामींचे उदात्तीकरण करण्याचे काम श्री श्री रविशंकर यांनी केले आहे. त्यांनी जाणिवपूर्वक इतिहासाचे विकृतीकरण करून खोडसाळ पध्दतीने महाराजांची बदनामी केली आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह रजपूत याने मुंबईत आत्महत्या केली. मुंबईसह बिहारमध्ये गुन्हा दाखल झाला. भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल का केला जात नाही ? असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करणा-या राज्यकर्त्यांना महाराजांची बदनामी केल्याचे प्रकरण महत्वाचे वाटत नाही का ? महाविकासआघाडी सरकार महाराजांची बदनामी करणा-याला पाठिशी घालत आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
असे आहे मोर्चाचे नियोजन
हा प्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, वाकड पोलीस ठाणे निरीक्षक यांच्याकडे तक्रारीद्वारे मांडलेला आहे. यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. वेळोवेळी पाठपुरावा केला. तरी देखील रितसर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. या सर्व यंत्रणेच्या निषेधार्त संभाजी ब्रिगेडने कायदेशीर पध्दतीचा अवलंब करत मोर्चाचे अस्त्र उपसले आहे. रविवारी (दि. 20) दुपारी तीन वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून अर्धनग्न मोर्चाची सुरूवात होणार आहे. निगडी भक्ती-शक्ती समुह शिल्पाला अभिवादन करून मोर्चा सोमवारी कामशेत, मंगळवारी खोपोली, बुधवारी कळंबोली, गुरूवारी वाशी येथे मुक्का करून शुक्रवारी मुंबई मंत्रालय येथे धडकणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, प्रमोदसिंह गोतारने, सचिव विशाल जरे, संघटक ज्ञानेश्वर लोभे, रशीद सय्यद, लहू लांडगे, सतिश कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.




