केदारनाथमध्ये तुफान बर्फवृष्टी, मंदिर सहा महिने राहणार बंद

रुद्रप्रयाग – देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिर परिसरात तुफान बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे मंदिर पुढील सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मंदिर बंद होण्यापूर्वी केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यात सुमारे दहा-बारा फूट उंचीपर्यंत बर्फ साचत असल्याने केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांचे दरवाजे, ज्याला स्थानिक भाषेत कपाट म्हणतात ते सहा महिन्यांसाठी नोव्हेंबरमध्ये बंद होतात. बद्रीनाथजींची उत्सवमूर्ती खालच्या भागात असलेल्या जोशीमठ येथील नरसिंग मंदिरात, तर केदारनाथांची उत्सवमूर्ती उखीमठ येथे आणली जाते. केदारनाथचे मंदिर केव्हा उघडणार याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी, तर यमुनोत्री मंदिर खुले होण्याची तारीख वसंत पंचमीच्या दिवशी जाहीर केली जाते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केदारनाथ मंदिराच्या परिसरात सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.




