Breaking-newsआंतरराष्ट्रीय

फिलिपीन्समध्ये दहशतवादी हल्ला! बॉम्बस्फोटात १४ जण ठार, ७५ जखमी

मनिला – संशयित इस्लामिक दहशतवाद्यांनी काल सोमवारी दक्षिण फिलिपीन्समधील एका शहरात घडवलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये १४ जण मृत्यूमुखी पडले, तर सुमारे ७५ सैनिक, पोलीस आणि नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अधिकजण सैनिक आहेत. फिलिपीन्समध्ये झालेला या वर्षातील हा सर्वाधिक भीषण दहशतवादी हल्ला आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या बंडखोरांकडून हल्ला होण्याचा धोका असल्याने अतिरिक्त कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हा हल्ला झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

एकीकडे फिलिपीन्सचे सरकार कोरोना साथीच्या भीषण संसर्गाला तोंड देत असतानाच, दक्षिण फिलिपीन्समधील सुलू प्रांतातील जोलो शहरात हे दोन्ही बॉम्बस्फोट घडवण्यात आले. पहिला दहशतवादी हल्ला दुपारच्या सुमारास करण्यात आला. येथील एका किराणा दुकान व कम्प्युटर दुकानासमोर उभ्या करण्यात आलेल्या दोन लष्करी ट्रकजवळ एका मोटरसायकलवर बसवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. सैनिक खरेदीसाठी आले असताना वाहनात ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवण्यात आला. मृत व जखमींमधील बहुसंख्य हे याच स्फोटातील आहेत.

दुसरा बॉम्बस्फोट इथून जवळच सुमारे तासाभराने झाला. हा स्फोट आत्मघातकी महिला दहशतवाद्याने घडविला. ही दहशतवादी एका नाश्त्याच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर रोमन कॅथलिक कॅथेड्रलच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांजवळ गेली आणि तिने स्वत:ला स्फोटाने उडवून दिले. त्यात तिच्यासह एक सैनिक आणि एक पोलीस ठार झाला, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली. या बॉम्बस्फोटांमध्ये आणखी एक सैनिक मृत्यूमुखी पडल्याचे लष्कराचे प्रवक्ता ले. जन. रोनाल्ड मातेओ यांनी सांगितले. मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button