मागण्या मांडण्यासाठी गेलेल्या आशा सेविकांना अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी हुसकावले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आशा सेविका आपल्या मागण्या मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांच्याकडे गेल्या. मात्र, त्यांच्या मागण्या ऐकून घेणे दुरच साधे त्यांना केबिनमध्ये घेऊन चर्चा करण्याचा सोज्वळपणा सुध्दा डॉ. डांगे मॅडमनी दाखविला नाही. त्यामुळे संतत्प आशा सेविकांनी आता आपला मोर्चा आयुक्तांकडे वळविला आहे. उद्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मागणीचे निवेदन देणार आहेत.
कोरोना काळात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणा-या डॉक्टरांनी आपला पगार वाडवून घेतला. सिस्टरच्या वेतनातही समाधानकारक वाढ झाली. मात्र, सिस्टरच्या खालचा आणि सर्वात महत्वाचा घटक मानल्या जाणा-या आशाताईंकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आपल्या मागण्या मांडण्यासाठी आज 25 आशा सेविका वायसीएम रुग्णालयातील अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांच्याकडे गेल्या होत्या. त्यांना चर्चा करून निवेदन देण्याची विनंती केली. मात्र, डांगे यांनी या आशा सेविकांशी चर्चा करणे टाळून त्यांना हुसकावून लावले. त्यामुळे आशा सेविका संतप्त झाल्या असून त्यांनी जर कामबंद सुरू केले तर सिस्टरांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्या बुधवारी (दि. 29) आशा सेविका एकत्र येऊन आयुक्त हर्डीकर यांना निवेदन देणार आहे. तसेच, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना सुध्दा निवेदन दिले जाणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही लढा कायम ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया आशा सेविकांनी दिली आहे.





