शहरात परिस्थिती गंभीर, पण मटणाचा आस्वाद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडकर खंबीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असली तरी खवय्यांची नगरी सुध्दा आहे. श्रावण महिन्याची सुरुवात आणि आषाढातील गटारीचा मुहूर्त साधून पिंपरी-चिंचवडकरांनी मटण, चिकण, मासे खरेदी करण्यावर सकाळपासून भर दिला. दुपारी एक वाजल्या तरी मटण, चिकण, मासे विक्रीच्या दुकानांसमोर ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळून शिस्तबध्द पध्दतीने तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून पिंपरी-चिंचवडकरांनी खरेदी केली.

कोरोनाने पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये हाहाकार माजवलेला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 13 जुलै ते 23 जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला. दरम्यान, आषाढ महिना असुन देखील पिंपरी-चिंचवडकरांना मनाप्रमाणे मटणाचा आस्वाद घेता आला नाही. आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता देऊन काही खाद्य पदार्थांच्या दुकानांना मोकळीक देण्यात आली. त्यामुळे आषाढी महिन्यातील गटारी साजरी करण्यासाठी आज सकाळपासून पिंपरी-चिंचवडकरांनी मटण आणि चिकण दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. तोंडाला मास्क अथवा रुमाल लावून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नागरिकांनी खरेदी केली.

शहराच्या विविध भागामध्ये नागरिकांनी चिकण, मटण दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने नागरिकांनी सोसशल डिस्टंसिंगचे पालन करत दुकानदारांना सहकार्य केले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे नागरिकांच्या चेह-यांवर आनंद दिसत होता.





