पुण्यात मास्कचा साठा करणा-यावर गुन्हा दाखल

पुण्यात मास्कचा साठा करणा-यावर गुन्हा दाखल

सोमवार पेठेतील होम लिंक एंटरप्रायझेस येथे मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख ३० हजार रुपये किमतीचे विविध प्रकारचे १७ हजार ८०५ मास्क जप्त करण्यात आले.

भूपेश ओमप्रकाश गुप्ता (वय ४६, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा रस्ता), रोहन अजय शुक्ला (वय २६, रा. सांडभोर वस्ती, मुंढवा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भूपेश गुप्ता होम लिंक एंटरप्रायझेसचा मालक आहे. शुल्का त्यांच्याकडे कामाला आहे. यांचे आणखी साथीदार असून त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

सोमवार पेठेत मास्कचा साठा करून ठेवला असून त्या मास्कची जास्त दराने विक्री केली जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त बच्चनसिंग, वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे आदींच्या पथकाने गोडउनवर छापा घातला. त्या वेळी विविध प्रकारच्या मास्कचा साठा तेथे आढळून आला.

‘करोना’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या मास्क व सॅनिटायझर्स हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे त्यांचा साठा करता येत नाही; तसेच जादा दराने विक्रीही करता येत नाही. आरोपींनी साठा करून मास्कची जादा दराने विक्री केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना कोर्टात हजर केले असता सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *