पवनाथडी जत्रेचा खर्च संशयाच्या भोव-यात?; वाढीव बिले घुसडली, तरतुदीपेक्षा जादा खर्च

जत्रेसाठी तरतूद 40 लाखाची, तर एकूण खर्च 63 लाख 22 हजार 977 रुपये नेमका झाला कसा?
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीस हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिकेने पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली. या जत्रेचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या प्रमाणात पवनाथडी जत्रेतून महिला बचत गटांना यथावकाश फायदा होताना दिसून येत नाही. गतवर्षीच्या पवनाथडी जत्रेचा खर्च हा अंदाजपत्रकीय तरतुदीपेक्षा जादा झाला आहे. हा खर्च नेमका कशावर झाला, तो कोणी केला, शिवाय वाढीव बिले एकूण खर्चात नंतर का घुसडली गेल्याने पवनाथडी जत्रेचा खर्च अवाढव्य झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा खर्च संशयाच्या भोव-यात अडकण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेतर्फे महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाही जत्रा भरवण्यात आल्याने हे 13 वे वर्ष होते. महापालिकेच्या पवनाथडी जत्रेचा खर्च वाढू लागल्याने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी फेब्रुवारी 2018 मध्ये पत्र देवून पवनाथडी जत्रा स्थगित करण्याची मागणी केलेली होती.
सन 2017-18 मध्ये पवनाथडी जत्रेसाठी महापालिकेने तब्बल 80 लाख रुपयांची बजेटमध्ये तरतूद केली. कदाचित यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो असेही नागरवस्तीच्या महिला व बालकल्याण समितीने सांगितले होते. त्यामुळे मागील काळातील अनुभव पाहता या उपक्रमातून बचतगटांना विशेष कार्य साध्य करता आलेला नाही. महिला बचत गटांना याचा यथावकाश फायदा ही होताना दिसत नाही. तसेच या उपक्रमातील खर्च निरर्थक होत असल्याचे दिसत आहे. तरी, पवनाथडी जत्रा हा उपक्रम स्थगित करण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्राद्वारे केलेली होती. मात्र, सदरील खर्च भाजप पदाधिका-यांनी अनावश्यक खर्च कमी करुन पवनाथडी जत्रा स्थगित न करता घेण्यात आली. त्यामुळे नागरवस्तीला पवनाथडीचा खर्च कमी करण्याच्या सुचनाही केल्या होत्या.

दरम्यान, सन 2018-19 मध्ये पवनाथडी खर्चाचा तपशिल कमी करुन एकूण तरतूद 40 लाख रुपयापर्यंत अंदाजपत्रकात करण्यात आली. त्यात मंडप व्यवस्था व स्टाॅल्स, विद्युत व्यवस्था, जागा भाडे, सांस्कृतिक कार्यक्रम व मानधन, जाहिरात छपाई, निवेदक, वक्तृत्व स्पर्धा, सुरक्षा व्यवस्था, मान्यवर व कलाकार चहापान हा खर्च ठरविण्यात आला होता. परंतू, पवनाथी जत्रा चित्रफित, आगाऊ रक्कम, जाहिरात छपाई (सन 2017-18) असा वाढीव खर्चही दाखवून त्या घुसडण्यात आला आहे. तसेच मंडप व स्टाॅल्सचा खर्चही वाढला गेल्याचे सांगण्यात आले आहे.
पवनाथडी जत्रेचा हा खर्च एकूण तरतुदीपेक्षा वाढल्याने निश्चितच लेखापरिक्षणाच्या रडारवर आला आहे. त्यामुळे पवनाथडी जत्रेच्या एकूण तरतुदीपेक्षा वाढीव केलेला खर्च कोणी आणि कशासाठी केला, त्याचा ताळमेळ लागत नसल्याने या खर्चाची चाैकशी होणे, अपेक्षित आहे.





