शेतक-यांच्या प्रश्नांसाठी ऊसतोड कामगारांचा मुलगा विधीमंडळात गरजला!

हे सरकार शेतक-यांचा कळवळा असल्याचं ढोंग करतेय – आमदार राम सातपुते
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करा, अधिवेशनात मागणी
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
सत्तेत येण्यापुर्वी शेतक-यांना हमी भाव देवू, त्यांचा सातबारा कोरा करु, मोफत वीज देवू असं म्हणणारे महाविकास आघाडीने शेतक-यांची फसवणूक केली असून अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान होवूनही मदत केलेली नाही. त्यामुळे शेतक-यांचा कळवळा असल्याचे ढोंग हे सरकार करतंय, अशी टीका भाजप आमदार राम सातपुते यांनी केली.
विधीमंडळ अधिवेशनात भाजप आमदार राम सातपुते यांनी शेतक-यांच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. सातपुते म्हणाले की, शेतक-यांचा पिकांना हमी भाव मिळालेला नाही. शेतक-यांचा मालाचा भाव हे व्यापारीच ठरवित असून मालाचा भाव पाडून मागवित आहेत. रात्री-अपरात्री माझा शेतकरी बांधव शेतात पिंकाना पाणी देतो. पण मोफत वीज देवू म्हणणा-यांनी अजून काहीच केलेला नाही.
तसेच शेतक-यांना कर्जमुक्ती देण्यास सातबारा कोरा करण्याची भाषा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. पण शेतक-याचा सातबारा कोरा झालाच नाही. आताच शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने वाया गेला आहे. अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्या शेतक-यांचे पंचनामे देखील केलेले नाही. तर मदत केव्हा मिळणार, असा सवालही सातपुते यांनी सरकारला विचारला आहे.




