मंदिराची तोडफोड केल्याप्रकरणी सिंध प्रांतात चार मुलांना अटक

महाईन्यूज |
मंदिराची तोडफोड केल्याच्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात चार मुलांना अटक करण्यात आली असून हिंदू मंत्र्याने या अल्पवयीन गुन्हेगारांवर ईश्वरनिंदेचा आरोप ठेवण्याची मागणी केली आहे. ही मुले १५,१३,१२ वयाची असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांनी मंदिरातील पैसे चोरण्यासाठी मंदिराची तोडफोड केल्याची कबुली दिल्याचे डॉन या वृत्तपत्राने म्हटलेले आहे.
माता देवल भित्तानी मंदिर सिंध प्रांतात थारमधील छाख्रो गावात आहे. त्याची रविवारी रात्री मोडतोड करण्यात आली होती. त्यात देवतांच्या मूर्तीही फोडण्यात आल्या. याबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल्ला अहमदियार यांनी सोमवारी सांगितले. चार आरोपी हे छाख्रो येथील असून त्यांना थारपरकार पोलिसांनी मंदिर फोडल्याप्रकरणी अटक केली. दरम्यान सिंधचे अल्पसंख्याक कामकाज मंत्री हरी राम किशोरी लाल यांनी सांगितले की, पोलिसांनी यातील आरोपींविरोधात ईश्वरनिंदेचा गुन्हा दाखल करावा.





