प्रीमियर बॅडमिंटन लीग : सिंधू, ताय झू महागडे खेळाडू

- प्रीमियर बॅडिमटन लीगच्या लिलावात ७७ लाखांची सर्वाधिक बोली; सात्त्विकला ६२ लाख
प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) पाचव्या हंगामासाठी मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या लिलावात विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असलेल्या ताय झू यिंग सर्वात महागडय़ा खेळाडू ठरल्या आहेत. या दोघींनाही प्रत्येकी ७७ लाख रुपयांची बोली लागली.
सिंधूला हैदराबाद हंटर्सने संघात कायम राखले, तर गतविजेत्या बेंगळूरु रॅप्टर्सने लिलावयुद्धात पुणे ७ एसेस संघावर कुरघोडी करीत चायनीज तैपेईच्या ताय झूला संघात स्थान दिले. भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीसाठी चेन्नई सुपरस्टार्सने ६२ लाख रुपये मोजले, तर बी. साईप्रणितला बेंगळूरु रॅप्टर्सने ३२ लाखांची बोली लावत संघात स्थान दिले. बी. सुमित रेड्डीसाठी चेन्नईने ११ लाख आणि चिराग शेट्टीसाठी पुण्याने १५.५० लाख रुपये मोजले.
राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची कन्या गायत्रीला चेन्नईने संघात स्थान दिले, तर आसामची उदयोन्मुख खेळाडू अश्मिता छलिहाला नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सने संघात घेतले.
‘पीबीएल’चा पाचवा हंगाम २० जानेवारी ते ९ फेब्रुवारी, २०२० या कालावधीत होणार असून, यात सहभागी होणाऱ्या १५४ खेळाडूंपैकी ७४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.





