राज्यसभेतील मार्शलच्या नव्या गणवेशाला विरोध; सभापतींकडून पुनर्विचाराचे आदेश

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले. यावेळी राज्यसभा सभापतींच्या मदतीसाठी तत्पर असलेले मार्शल अचानक नव्या गणवेशात दिसून आले. सैन्य अधिकाऱ्याप्रमाणे असलेल्या मार्शलच्या या गणवेशाला राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवरांनी विरोध दर्शवला. त्यामुळे सभापती वैंकय्या नायडू यांनी मार्शलच्या या गणवेशाबाबत पुनर्विचाराचे आदेश दिले आहेत.सभापती नायडू यांनी मंगळवारी सभागृहात सांगितले की, राज्यसभा सचिवालयाने मार्शलसाठी नवा ड्रेसकोड तयार केला होता. मात्र, राजकीय नेते आणि काही बुद्धीजीवी नागरिकांकडून याबाबत सुचना आणि प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे याचा पुनर्विचार करण्याचे आदेश सचिवालयाला देण्यात आले आहेत.
राज्यसभेत सभापतींच्या खुर्चीमागे उभे राहणारे मार्शल यापूर्वी शुभ्र रंगाचा बंद गळ्याच्या शर्ट आणि विजारीसह डोक्यावर तुऱ्यासारख्या पगडीचा पेहराव करत होते. मात्र, सोमवारी हे मार्शल नेहमीचा गणवेश धारण न करता सैन्य अधिकाऱ्याप्रमाणे गडद निळ्या रंगाचा सूट, डोक्यावर सीकॅप आणि खांद्यावर रँकप्रमाणे पट्ट्या अशा पेहरावात दाखल झाले होते.मार्शलच्या पेहरावात अचानक झालेला बदल पाहिल्यानंतर माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी याला विरोध दर्शवला. त्यांनी एका ट्विटद्वारे यावर आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, सैन्याशी संबंधित नसलेल्या लोकांनी सैन्याच्या गणवेशाची नक्कल करणे आणि तो परिधान करणे बेकायदा असून सुरक्षेसाठी धोकादायकही आहे.





