विजय मल्याच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

फरारी मद्यसम्राट , आर्थिक गुन्हेगार विजय मल्या याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांच्या मालमत्ता जप्त करण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर २ ऑगस्टला सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी संमती दिली.
या मालमत्ता जप्त करण्याची कृती व संबंधित कायदा यांच्या वैधतेबाबत प्रलंबित असलेल्या याचिकेसोबत नव्या याचिकेची सुनावणी केली जाऊ शकते, हा मल्या यांचे वकील एफ.एस. नरिमन यांचा युक्तिवाद सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मान्य केला आणि ही याचिका येत्या शुक्रवारी सुनावणीला ठेवली.
आपल्या व नातेवाईकांच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्यावर स्थगिती द्यावी, या मागणीसाठी मल्याने २७ जूनला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कथित आर्थिक अनियमिततांच्या संदर्भात किंगफिशर एअरलाइन्सव्यतिरिक्त इतर कुठल्याही मालमत्तांवर टांच आणली जाऊ नये, असे मल्या याने याचिकेत म्हटले आहे. मल्ल्याच्या मालमत्तांच्या जप्तीबाबत एका विशेष न्यायालयासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने ११ जुलैला नकार दिला होता.




