उमेदवार बारणेंचं कसं… ‘भाऊ’ म्हणतील तसं….

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी बारणे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात समेट घडविण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी बोलणी केली. मात्र, जगतापांच्या मनावर त्याचा प्रभाव झाला नसल्याचे दिसते. बारणेंच्या प्रचारात सक्रिय भाग घेतलेला नसताना भाऊंची एक इमेज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. “आम्हाला कोणी गृहीत धरू नये, अफवांना बळी पडू नका, भाऊंनी अद्याप आदेश दिलेला नाही”, असा चक्क इशाराच कार्यकर्त्यांना त्यातून दिला गेला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खासदार बारणे आणि आमदार जगताप यांचा संघर्ष टोकाला गेलेला होता. दोघांमध्ये धुमसती आग असताना मावळ लोकसभेसाठी उमेदवार बारणे यांचा प्रचार करण्याकरिता संजय राऊत यांनी जगतापांना पिंपरीत येऊन साकडे घातले. तथापि, जगतापांनी कार्यकर्त्यांची भावना याबद्दल जाणून घेतली. त्यावर, कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यात सहभागी होण्यास नकार दिल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे जगताप कार्यकर्त्यांच्या पुढे जाणारे नेते नाहीत. बारणेंनी आजपर्यंत आपल्यावर केलेल्या आरोपांचे कारायचे काय, असा प्रश्न जगतापांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या मध्यस्तीनंतरही बारणे-जगताप यांच्यात यशस्वी समेट घडू शकला नाही.
भाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये बारणेंच्या विषयी प्रचंड नाराजी असल्याचे दिसते. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मजकूर असलेली भाऊंची इमेज व्हायरल होत आहे. त्यात नमूद आहे की, “आम्हाला आमचे भाऊ जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला आमचे समर्थन नाही. कोणत्याही आफवांना बळी पडायचं नाही आणि कुणी गृहीत धरूही नका. लक्ष्मण भाऊ जगताप यांचा शब्द तोच शेवट आणि तोच आदेश माणतो आम्ही, म्हणून कसं तर भाऊ म्हणतील तसं…” अशी साद देखील कार्यकर्त्यांना घालण्यात आली आहे. परंतु, ही इमेज नेमकी तयार केली कोणी, व्हायरल कशी केली गेली, याची माहिती समोर आलेली नाही.




