PCMC : भाजप सरकारच्या निषेधार्त राष्ट्रवादीचे उद्या “मौन आंदोलन”

पिंपरी (महा ई न्यूज) – भाजपच्या नेत्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत याच्या निषेधार्त राष्ट्रवादी काँग्रेस उद्या मंगळवारी (दि. 2) महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून राज्यभरात ‘मौन आंदोलन’ करणार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
चिंचवड येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सत्य, शांतता, अहिंसेचा संदेश दिला. भाजप सरकारची असत्य, हिंसा, अशांती ही तत्वे आहेत. सरकार फसव्या घोषणा करत आहे. या फसव्या सरकारचा उद्या राज्यभरात शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात येणार आहे. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. त्यानंतर नऊ ते बारा या वेळेत मौन आंदोलन करण्यात येणार आहे.




