Breaking-newsआंतरराष्ट्रीय

मेक्‍सिकोमध्ये डाव्या पक्षाचे ओब्राडोर नवे अध्यक्ष

  • अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यावर भर देणार

मेक्‍सिको सिटी – डाव्या विचाराचे नेते अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा मेक्‍सिकोच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. ओब्राडोर यांना 53 टक्के मतं मिळाली तर अनाया यांना 22.8 टक्के मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकवर आलेल्या होजे अँटोनियो मिइडे यांना 16 टक्के मते मिळाली.

ओब्राडोर हे मेक्‍सिको सिटीचे माजी महापौर देखील आहेत. ते (एएमएलओ) अमलो या नावानेही ओळखले जातात. देशातला भ्रष्टाचार आणि हिंसा आटोक्‍यात आणणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. भ्रष्टाचारामुळेच देशात असमानता निर्माण झाल्याचं ते म्हणाले आहेत.

निवृत्तीधारकांच्या वेतनात दुपटीनं वाढ तसेच अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्यात येतील असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आल्यापासून मेक्‍सिको आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मेक्‍सिकोतून येणाऱ्या स्थलांतरितांवर ट्रम्प यांनी नेहमीच निशाणा साधला आहे. तरीही ट्रम्प यांनी ओब्राडोर यांचे अभिनंदन केले आहे.

मेक्‍सिकोमध्ये निवडणूक प्रचाराच्या काळात 130 राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हिंसा आटोक्‍यात आणली जाईल असेही आश्वासन ओब्राडोर यांनी दिले आहे. तसेच मेक्‍सिकोतले व्यापारी धोरण बदलण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. व्यवसायाला चालना मिळेल असे वातावरण निर्माण करण्याबाबत आपण आग्रही आहोत, तसेच, करात कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही आणि खासगी व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण होणार नसल्याची ग्वाही त्यांनी खासगी व्यावसायिकांना दिली आहे.

या निवडणुकीत द्वितीय क्रमांकावर असलेले कंझर्व्हेटिव पार्टीचे नेते रिकार्डो अनाया यांनी आपला पराभव मान्य करत ओब्राडोर यांचे अभिनंदन केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button