ब्राझिलचा मेक्सिकोवर २-० ने विजय

समारा अरेना- पाचवेळच्या विश्वचषक विजेत्या ब्राझिलने मेक्सिकोचा २-० असा पराभव करत विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात गोलशुन्य बरोबरी राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रात ब्राझिलने आक्रमक खेळ करत ५१व्या मिनिटाल नेमारने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या ८८व्या मिनिटाला रॉबर्टो फर्मिनोने दुसरा गोल झळकावत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.
तत्पूर्वी, ब्राझीलचा संघ आक्रमणासाठी ओळखला जातो. पण फुटबॉल विश्वचषकातील उपउपांत्यपूर्व मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या सत्रात ब्राझीलचा खेळ शांत असाच राहिला. पहिल्या सत्रात चेंडूवर ५२ टक्केवेळ ब्राझिलचे वर्चस्व राखले तर मेक्सिकोने ४८ टक्केवेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवला. ब्राझीलला मेक्सिकोच्या संघाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या सत्रात बचाव करण्यावर अधिक भर दिला. मेक्सिकोच्या संघाने सामन्यात चांगले आक्रमण लगावले, पण त्यांना एकही फटका गोलजाळ्याजवळ मारता नाही आला. कारण ब्राझीलने या सामन्यातील पहिल्या सत्रात अभेद्द बचाव केला. ब्राझीलने तीनवेळा मेक्सिकोच्या गोलजाळ्यावर आक्रमण केले, पण मेक्सिकोचा गोलरक्षक ग्युलेर्मो ओचोआने चांगला बचाव केला. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्या सत्रात एकही गोल करता आला नाही, त्यामुळे पहिले सत्र ०-० असे बरोबरीत राहिले होते.





