ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांचा देहत्याग

सिडनी : ऑस्ट्रेलियातील १०४ वर्षांचे शास्त्रज्ञ डेव्हिड गुडॉल यांनी गुरुवारी स्वित्झर्लंडमध्ये देहत्याग केला. गुरुवारी रात्री गुडॉल यांनी अखेरचा श्वास घेतला. जगण्याला आता कंटाळलो, असे सांगत गुडॉल हे इच्छामरणासाठी ऑस्ट्रेलियाहून स्वित्झर्लंडमध्ये गेले होते. जगणे परिपूर्ण झाले, असे त्यांनी मृत्यूपूर्वी म्हटले होते.
भारतात स्वेच्छामरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुन अजूनही वाद सुरु असतानाच स्वित्झर्लंडमध्ये शास्त्रज्ञ डेव्हिड गु़डॉल यांनी स्वेच्छामरणाचा निर्णय जाहीर केला होता. स्वेच्छामरणासाठीच ते ऑस्ट्रेलियावरुन स्वित्झर्लंडमध्ये आले. स्वित्झर्लंडमध्ये १९४०पासून वैद्यकीय साह्याने इच्छा मरणाचा अधिकार आहे.
‘गुडॉल यांनी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला’, अशी माहिती एक्झिट इंटरनॅशनलचे संस्थापक फिलीप निश्के यांनी दिली. ही संस्था इच्छा मरणासाठी काम करते. गुडॉल यांच्या स्वेच्छामरणाच्या निर्णयानंतर याच संस्थेने त्यांना मदत केली. स्वेच्छामरणाची प्रक्रिया पूर्ण करताना गुडॉल थोडे कंटाळले होते. ही किती मोठी प्रक्रिया आहे, असे त्यांचे शब्द होते, असे फिलीप यांनी माध्यमांना सांगितले. गुडॉल यांनी मृत्यूपूर्वी शेवटच्या भोजनात मासे, चिप्स आणि चीझकेकचा आस्वाद घेतला, असे त्यांनी सांगितले. गुडॉल यांच्या इच्छेनुसार खोलीत बीथोवनची ‘नाइन्थ सिम्फनी’ लावण्यात आली होती, असे त्यांनी नमूद केले. ‘नाइन्थ सिम्फनी’ ही अखेरची सुरावट म्हणजे पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च सांगीतिक कृती मानली जाते.





